दवाखाना

दवाखाना हा लोक बिरादरी प्रकल्पाचा मूख्य आधारस्तंभ आहे. या दवाखान्याचे क्षेत्र आता व्यापक झाले आहे. पण जे रुग्ण दवाखान्यात येतात, त्यांची स्थिती बहुधा गंभीर असते. माडिया आदिवासींची दु:ख सहन करण्याची क्षमता प्रचंड आहे पण बर्याचदा जेव्हा ते दवाखान्यात येतात तेव्हा त्यांची स्थिती खूपच बिकट झालेली असते. कारण आजार झाल्यावरही बरेच दिवस , बरेच आठवडे त्यांना दवाखान्यात आणले जात नाही. पाठ्य-पुस्तक उपचार पद्धती अशावेळेस बर्याचदा अपुरी पडते कारण रुग्णांची स्थिती खूपच नाजूक असते.
ऐंशी च्या सुरुवातीला डॉ.प्रकाश ना scurvy चे बरेच रुग्ण असल्याचे आढळून आले. विटामिन सी च्या कमतरतेमुळे होणारा हा रोग आहे, ज्यामुळे दाताच्या हिरड्या कमजोर होतात.
प्रकाशनी यासंदर्भात पुढे तपास करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्याकडे आलेले रुग्ण बस्तर जिल्ह्यातील गावातून आले होते व त्या सर्व स्त्रिया होत्या. पुढची तपासणी करण्यासाठी त्यांनी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. हे अवघड काम होते. हा प्रवास जीपने इंद्रावती नदीच्या काठावरून होता परत थोडा प्रवास बोटीने आणि शेवटी १५ किलोमीटर चालत असा हा अवघड प्रवास होता.डॉ. प्रकाशना आढळले की त्या गावाच्या सभोवताली खूप झाडे आहेत . झाडे, हिरवळ कमी असणे हे scurvy चे कारण असू शकते . पण ते कारण इथे नव्हते : गावातील लोकांशी बोलल्यावर त्यांना खरे कारण कळले.
पारंपारिक माडिया वैद्य गावातील प्रत्येक लोकांना एक खाद्य पदार्थ देवाच्या नावाने बलिदान करायला लावायचा. गावातील वैद्य त्यांना बांबू शूट्स खाऊ नका असे सांगत असे, पण बांबू शूट्स माडियांच्या आहारातील एक मुख्य भाग आहे. तो विटामिन सी चा मोठा स्त्रोत आहे.आपल्या शरीरात विटामिन सी थोड्या प्रमाणात साठवून ठेवलेले असते. म्हणून, फक़्त ज्या स्त्रिया आपल्या बाळाला दुध पाजतात त्याच स्त्रियांना हा रोग झालेला होता कारण ते विटामिन त्यांच्याकडून त्यांच्या बाळांना मिळते.
या भागामध्ये अजून एक रोग आहे तो म्हणजे मेंदूज्वर (सेरेब्रल मलेरिया) जवळपास प्रत्येक जण या रोगापासून बाधित आहे. कीटकनाशक फवारणी केली असती तर या रोगापासून लोकांना मुक्तता मिळाली असती पण सरकार नेही याकडे दुर्लक्ष केले आहे.सर्प दंश आणि अस्वलांचे हल्ले ही या भागातील नेहमीचे प्रश्न आहेत. माडिया लोक शिकार करायला जातात तेव्हा या दोन प्राण्याची त्यांना भीती तर असतेच. छायाचित्रात एकाचे चित्र दिले आहे. तो काही लोकांबरोबर शिकार करायला गेला असताना त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला, त्याने त्याच्या चेहर्यावर आणि डोक्यावर हल्ला केला त्यामुळे त्या माणसाला आपले डोळे गमवावे लागले यावर बरेच आठवडे उपचार केले त्यामुळे तो माणूस वाचू शकला पण त्याला आपले डोळे गमवावे लागले. पुढे एक वर्षाने दुसर्या आजारामुळे तो मरण पावला.
शाळा
जेव्हा लोक बिरादरी प्रकल्प सुरु झाला तेव्हा शाळे संदर्भात काही विचार झाला नव्हता. पण आदिवासी लोकांचे शोषण होत आहेत हे पाहून डॉक्टरांना जाणीव झाली की या लोकांना आपल्या अधिकाराची जाणीव व्हायला हवी. यासाठी त्यांना शिक्षणाची गरज आहे इतकेच नव्हे तर त्यांना शेतीविषयक माहिती, चांगले आरोग्य याविषयी पण माहिती असली पाहिजे.

गोपाळ फडणीस हे हेमलकसा शाळेतील प्राचार्य आहेत.त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या गावी झाले.त्यांनी आपली पदवी इंग्रजी साहित्यामधून नागपूर विद्यापीठातून १९७२ मध्ये पूर्ण केली आणि बल्लारपूर मध्ये प्राध्यापक म्हणून काम सुरु केले. ते आनंदवन आणी भामरागड यांच्या मधोमध आहे. १९७६ साली त्यांनी आनंदवनाला भेट दिली. १९७६ साली त्यांनी हेमलकसा ला भेट दिली. डॉ. प्रकाश आणि इतर सहकार्यांची कामे त्यांनी पहिली आणि बाबांसमोर शाळा सुरु करण्याची कल्पना मांडली .
काही दिवसांनी बाबा आणी गोपाळ सोमनाथ ला गेले, तिथे वार्षिक युवा शिबीर चालू होते. ते याचवेळी हेमलकसा येथे जायचा निर्णय गोपाळ फडणीसांनी बाबांना सांगितला.
पहिल्या वर्षी गोपाळ, रेणुका मनोहर,
मुकुंद आणि इतर कार्यकर्ते यांनी शिकवण्याचे काम केले. बाबा पांचाळ यांना शेतीचा कारभार सोपवण्यात आला.
पण १९७८ साली त्यांना शाळेच्या विभागात टाकण्यात आले आणि विलास मनोहर यांच्याकडे शेतीचे आणी सामान्य प्रशासनाचे
कारभार सोपवले. त्याच वर्षी गोपाळ फडणीसांचे लग्न झाले आणि त्यांची पत्नी सुद्धा शाळेला रुजू झाली.१९७८
मध्ये मुकुंद एक नवे उप केंद्र उघडण्यासाठी लाहिरी गावी गेले आणि गोपाळ
यांनी शाळेचा कारभार सांभाळला .
शाळा चालवणे अवघड गोष्ट होती. कारण पुस्तके मराठीत होती पण मुलांना फ़क़्त माडियाच भाषा येत होती, जी गोपाळना नवीन होती. दुसरी अवघड गोष्ट म्हणजे मुलांना पूर्ण वेळ शाळेत राहण्याचा अनुभव नव्हता.या मुलांची गावे हेमलकसापासून दूर अगदी ४० किलोमीटर होती. कधी कधी मुले शिक्षकांना न सांगता शाळेतून पळून जायची आणि त्यांना परत आणण्यासाठी शिक्षकांना त्यांच्या घरी जावे लागत असे. कधी कधी मुलांचे आई-वडील त्यांना भेटायला यायचे आणि रविवारी शिक्षक त्यांच्या गावी जात असत.यामुळे त्यांचे एकमेकांसोबत घनिष्ट नाते प्रस्थापित होत होते.
पहिल्या वर्षी शाळेत २५ विद्यार्थी होते तर दुसर्या वर्षी ने ५० झाले. त्यानंतर हळूहळू विद्यार्थ्यांच्या संखेत वाढ व्हायला लागली. आज त्या शाळेत ६५० विद्यार्थी आहेत. वर्षाच्या दरम्यान विद्यार्थींच्या वजनात ९ ते २० किलो ची वाढ व्हायची पण त्यांचे वजन उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कमी व्हायचे कारण त्यांना घरी सकस जेवण मिळत नसे.
फाईल
विद्यार्थी संख्या - ६५०
शिक्षक संख्या - १७
आदिवासी मुलींची संख्या - २५०
आदिवासी मुलांची संख्या - ४००
वर्ग - १ ली ते १२ वी.
औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्त खालील नमूद केलेलं शिक्षणही शाळेत दिले जाते .
अ) आदिवासी मुलांसाठी वैद्यकीय प्रशिक्षण ( प्राथमिक चिकित्सा )
ब) व्यावसायिक प्रशिक्षण - बांबू शिल्प, ग्रीटिंग कार्ड, संगीत शाळा.
क) शेती प्रशिक्षण आणि फलोद्यान प्रशिक्षण.
अतिरिक्त कार्ये
औपचारिक शिक्षणाशिवाय शिक्षकांनी शेतीविषयक प्रशिक्षणावर पण भर दिला. माडिया गोंड जमातीला भाजी उत्पादन माहित नव्हते. त्यांना फ़क़्त भात उत्पादनाची कल्पना होती बाकीच्या गरजा ते जंगलातून पूर्ण करत असत. कुत्रा, मांजर, माकड, पक्षी अशासगळ्याचे मास ते खायचे.ते बरेचदा हे मास वाळायला ठेवत असत ज्यामुळे ते जास्त दिवस टिकायचे.
लोक बिरादरीच्या कार्यकर्त्यानी आदिवासींना संक्रमित बी-बियाणे दिले ज्यामुळे त्यांचे पिकांचे उत्पादन वाढले . भाजी, फळे यांच्या बी-बियाणी चे ही वाटप त्यांनी केले . शाळेच्या विद्यार्थ्यांना सुधारित शेतीविषक तंत्रज्ञान पण देण्यात आले.यामुळे प्रत्येक आदिवासीं भाजी आणि फळे यांची पीकेही घेऊ लागला.सरकारने ही मग संक्रमित बी-बियाणांचे वाटप चालू केले. दुसरी महत्वाची कामगिरी म्हणजे जल-सिंचन सुविधा प्राप्त करून देणे. कधी कधी जास्त पावसाने पिकांचे नुकसान होत असे अशा वेळी लोक बिरादरी प्रकल्पातर्फे डिझेल वर चालणारे पंप भाड्याने दिले जात. ही प्रक्रिया अजूनही सुरु आहे पण आता बर्याच आदिवासींकडे स्वत:चे पंप्स आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी प्रकल्पातर्फे यावर प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी २० पंप्स पंप्स दुरुस्त होतात. कीटक नाशक फवारणी करीता स्प्रे पंप्स पण लोक बिरादरी प्रकल्पाकडून भाड्याने दिले जातात.
अनौपचारीक न्यायालय
आदिवासींनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यामध्येच एक परीषद नेमली होती. न्यायालयात जाणे काही सोपे नव्हते कारण सर्वात जवळचे न्यायालय १७० किलोमीटर दूर सिरोंचा येथे होते. त्यामुळे काही प्रश्न पोलीसांकडे जाऊ लागले.पोलीसांनी प्रश्न सोडवण्यापेक्षा ते वाढवत आदिवासींचा एक प्रकारे छळच सुरु केला.
म्हणून मग आदिवासी डॉ. प्रकाश यांच्या कडे प्रश्न सोडवायला येऊ लागले. बरीच भांडणे लग्नविषयक असायची.उदा.एक मुलगी एका मुलासोबत लग्न करायला तयार असायची पण तिने याच्या अगोदर दुसर्या मुलाला पण 'हो' म्हटले असायचे. जेव्हा गावातील लोक लग्नाला विरोध करायचे तेव्हा जोडपे हे प्रकरण घेऊन प्रकाशकडे जायचे. प्रकाश त्यांना सांगायचा की, ज्या मुलाला मुलीने आधी हो म्हटले आहे त्या मुलाला आताच्या मुलाने भरपाई द्यावी लागेल कारण माडिया मध्ये अशी प्रथा होती कि मुलगी ज्या मुलासोबत लग्न करणार त्या मुलाला त्याच्या सासरच्या घरी काम करावे लागणार. लोक बिरादरी प्रकल्पाच्या 'गोकुळ' या अनाथालया चा उल्लेख करायला हवा. माडिया लोक गायीचे दूध काढत नसत त्यामुळे बाळाला जन्म दिल्यावर आई जर मृत्यू पावली तर त्या बाळाला दूध नसायचे आणि त्यामुळे ते बाळ पण जास्त दिवस जिवंत राहायचे नाही. अशा जवळपास २० मुले आणि मुलींची या अनाथालयात काळजी घेतली जाते त्यातली काही लोक बिरादरीचे कार्यकर्ते सांभाळतात तर काही ३ वर्षाची झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांना परत देण्यात येतात.
आमटे प्राणी संग्रहालय (अनाथालय आणि बचाव केंद्र)
हेमलकसा जवळील शाळा प्रकल्पाला भेट देतात. त्यांचे मुख्य आकर्षणाचे केंद्र असते हेमलकसातील प्राणी संग्रहालय. यांमध्ये चित्ता, सिंह , वाघ, हरीण, नीलगाय, ओटर्स, अस्वल, कोब्रा, वायपर्स, मांजरी, कोळे, माकड, मगर असे बरेच प्राणी आहेत. या सर्व प्राण्यांचा उल्लेख विलास मनोहर यांनी त्यांच्या पुस्तकात सुंदररीत्या केला आहे. हे पुस्तक इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषेमधून पण उपलब्ध आहे आणि प्रत्येक पशुप्रेमी ने हे पुस्तक वाचायला हवे.

या प्राणी संग्रहाल्याची सुरुवात प्रकल्प सुरु केल्यावर एका वर्षाने झाली. प्रकाश काही विदेशी पाहुण्यांना माडियांचे देव दाखवायला घेऊन जात होते. परतीच्या मार्गावर असतांना त्यांना काही आदिवासी शिकार करून परतताना दिसले. दोन माकडांची त्यांनी शिकार केली होती त्यातील एक मादी होती आणि तिचे बाळ तिच्या छातीला बिलगून होते. प्रकाशने हे पहिले आणि म्हणाला, ते माकड मला द्या, आणि त्यांनी त्या छोट्या माकडाचा काळजी घ्यायला सुरुवात केली. ते माकड आपल्या आईला विसरून प्रकाशला आपली आई मानू लागले. बबलाई देवतेच्या मार्गावर जाताना त्यांना हे माकड दिसले होते म्हणून त्यांनी त्यांचे नाव बबली असे ठेवले आहे. बबली हा प्रकल्पातील पहिला प्राणी आहे.
सापांतील राजा म्हणजे क्रेट. हा लांबी ला खूप जास्त आणि त्यावर काळे आणि नारंगी रंगाचे पट्टे आहेत. हा कोब्रा पेक्षा २० पटीने जास्त विषारी आहे. त्याच्या दंशावर उपचार थायलंड मध्ये आहे. हेमलकसा येथे यांची संख्या भरपूर आहे. लोक बिरादरी प्रकल्पातच यातील २ आहेत. या सापांचे भोजन म्हणजे दुसरे साप.
प्रकल्पावर चित्त्यांचे पहिले जोडपे १९८२ मध्ये आले. तोपर्यंत सगळ्या प्राण्यांना शाकाहारी भोजन होते. या जोडप्यांला सुरुवातीला शाकाहारीच भोजन देण्यात यायचे. त्यामुळे यातला एक मरण पावला. एक दिवशी प्रकल्पात एक कोंबडी मरण पावली आणि ती त्या चित्त्याला देण्यात आली. शाकाहारी खाऊन तो चित्ता शाकाहारी बनला असेल आणि तो ही कोंबडी खाईल की नाही असा विचार काही जण करत होते. पण त्याने ती कोंबडी आवडीने खाल्ली, त्यामुळे त्याच्या प्रकृतीमध्ये पण सुधारणा झाली. त्यानंतर जेव्हा कुठला प्राणी मरण पावायचा, तेव्हा डॉ. प्रकाश, विलास आणि सहकारी त्याच्या मासाचे छोटे तुकडे करून फ्रीझर मध्ये साठवून ठेवायचे. वीज नसल्यामुळे त्यावेळी प्रकल्पावर रॉकेलचा फ्रीज होता. औषधे आणि हे मांस साठवून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा.
सुरुवातीला चित्त्याला फ़क़्त मांस खायला द्यायचे, कातडी आणी बाकीचे भाग फेकून दिला जायचा. एकदा चुकून त्याला कातडीसोबत मांस खायला देण्यात आले आणि त्याने ते आवडीने खाल्ले. त्यानंतर त्याला मेलेल्या जनावरांच्या अवयवांचे छोटे तुकडे देण्यात यायचे यामुळे त्याच्या प्रकृतीमध्ये आणि पचनशक्तीतही सुधारणा झाली . काही काळानंतर डॉ. प्रकाशनी एक मादी चित्ता नर साठी (नेगळ - माडिया शब्द ) एका जंगल अधिकार्याकडून चंद्रपूरहून आणली. तिला नेगळी नाव दिले गेले. काही वर्षानी नेगळचा सर्प दंशाने मृत्यू झाला तेव्हा नेमके प्रकाश काही दिवस प्रकल्पाच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.
