बांबू हस्तकला प्रशिक्षण

मुलांच्या विविधांगी व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण आज मुलांना प्रकल्पावर दिले जाते. प्रकल्पावरील हे प्रशिक्षण केंद्र बांबू हस्तकलेच्या दृष्टीने आवश्यक अवजारांनी युक्त आहे. दरवर्षी अनेक मुले इथे शिकून नवनवीन वस्तू बनवतात. प्रशिक्षणादरम्यान बनवलेल्या वस्तू महाराष्ट्रभर भरणाऱ्या अनेक प्रदर्शनांत लोक बिरादरी प्रकल्पाच्या वतीने विक्रीसाठी ठेवल्या जातात आणि त्यायोगे प्रकल्पास आर्थिक पाठबळ मिळवून देतात.

दुग्ध व्यवसाय

लोक बिरादरी प्रकल्प विकासकार्या-अंतर्गत दुग्ध व्यवसाय केला जातो. दूध आणि दूधाचे पदार्थ जवळपासच्या गावातील लोकांसाठी दररोज विक्रीस ठेवले जातात. रोज किमान ८० ते १०० लिटर आरोग्यकारक व चांगल्या प्रतीचे दूध प्रकल्पाच्या दुग्धालयामार्फत विकले जाते आणि त्याबरोबर दही, पनीर सारखे दुग्धजन्य पदार्थ दिवसातून २ वेळा विक्रीसाठी उपलब्ध असतात.

शेती प्रकल्प

औपचारिक शिक्षणाशिवाय शिक्षकांनी शेतीविषयक प्रशिक्षणावर सुध्दा भर दिला. माडिया गोंड जमातीला भाजी उत्पादन माहित नव्हते. त्यांना फ़क़्त भात उत्पादनाची कल्पना होती. बाकीच्या गरजा ते जंगलातून पूर्ण करत असत. कुत्रा, मांजर, माकड, पक्षी अशा सर्व प्राण्यांचे मांस ते खायचे. ते बरेचदा हे मास वाळायला ठेवत असत ज्यामुळे ते जास्त दिवस टिकायचे.

लोक बिरादरीच्या कार्यकर्त्यानी आदिवासींना संक्रमित बी-बियाणे दिले ज्यामुळे त्यांचे पिकांचे उत्पादन वाढले . भाजी, फळे यांच्या बी-बियाणांचे ही वाटप त्यांनी केले. शाळेच्या विद्यार्थ्यांना सुधारित शेतीविषक तंत्रज्ञान पण देण्यात आले.यामुळे प्रत्येक आदिवासीं भाजी आणि फळे यांची पिकेही घेऊ लागला.सरकारने ही मग संक्रमित बी-बियाणांचे वाटप चालू केले. दुसरी महत्वाची कामगिरी म्हणजे जल-सिंचन सुविधा प्राप्त करून देणे. कधी कधी जास्त पावसाने पिकांचे नुकसान होत असे अशा वेळी लोक बिरादरी प्रकल्पातर्फे डिझेल वर चालणारे पंप भाड्याने दिले जात. ही प्रक्रिया अजूनही सुरु आहे पण आता बर्‍याच आदिवासींकडे स्वत:चे पंप्स आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी प्रकल्पातर्फे यावर प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी २० पंप्स दुरुस्त होतात. कीटक नाशक फवारणी करीता स्प्रे पंप्स पण लोक बिरादरी प्रकल्पाकडून भाड्याने दिले जातात.