साधना विद्यालय

५ मे २०१५ ला स्थापन झालेले साधना विद्यालय, लोक बिरादरी प्रकल्पातर्फे त्या वंचित आदिवासी मुलांना शिक्षण देण्यासाठी चालविले जाते, जे आजही अतिशय घनदाट जंगलात राहतात आणि आजच्या आधुनिक जगातही मुलभूत सुविधांनादेखील पारखे झालेले आहेत.

फेब्रुवारी २०१५ ला, साधारण १८ गावातील गावकरी लोक बिरादरी प्रकल्पात आले आणि त्यांनी शाळा व वैद्यकीय मदत केंद्र सुरु करण्याची विनंती केली. ह्यातल्या प्रत्येक गावात जिल्हा परिषदेची (सरकारी) शाळा आहे. पण, शिक्षक कधीच येत नाहीत. सौ. समीक्षा आमटे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाने एका अभ्यास गटाची स्थापना केली. या गटाने अशासकीय संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या काही शाळांना भेटी दिल्या. गावकऱ्यांनीच नेलगुंडा गावाची शाळेच्या जागेसाठी शिफारस केली. कारण आठवड्याचा बाजार येथेच भरतो. त्यामुळे आसपासच्या गावातील मुलांना ते सोयीचे झाले असते. एका स्थानिक आदिवासीकडून ३० वर्षांसाठी २ एकर जागा प्रकल्पाने भाड्याने घेतली. गावकऱ्यांनीच शाळेची पहिली इमारत बांधली.


आमचा दृष्टीकोन
  • आदिवासींच्या जीवनशैलीशी सुसंगत अशा शिक्षणप्रक्रियेची सुरुवात करणे
  • स्वअध्ययनाची रुजुवात करणे आणि विद्यार्थ्यांची आवड आणि कुवत समजून घेऊन त्यांना स्वतःची उद्दिष्टे गाठण्यासाठी मदत करणे
  • भविष्यात शाळेची सर्व सूत्रे स्थानिक समाजातील समर्थ हातांत सोपवणे

साधना विद्यालय प्रकल्पापासून साधारण २५ किलोमीटरवर आहे. शाळेपर्यंत जाण्यासाठी कुठलाही कच्चा किंवा पक्का रस्ता नाही. शाळेपर्यंत पोहोचणे, अगदी तुमच्याकडे गाडी असली तरीही, अतिशय आव्हानात्मक आहे. पण, ९ शिक्षक आणि ३ कर्मचाऱ्यांचा सेवाभावी संघ दररोज हे आव्हान त्या मुलांसाठी स्वीकारतो, जी जंगलाच्या अतिशय दुर्गम भागातून रोज शाळेत येतात. ही मुले नेलगुंड्याच्या आसपासच्या ज्या गावांतून येतात, त्यांची माहिती खाली दिलेली आहे.


गाव साधना विद्यालयापासून अंतर (किलोमीटर)
महाकपाडी
मोरोमेट्टा
मिडदापल्ली २.५
गोंगवाडा
कवंडे
भटपर ४.५
परायणार ५.५

शाळेचे घोषवाक्य आहे, "चुकते कई बातल आयो", म्हणजेच 'चुकलं तरी हरकत नाही'. शाळेचे माध्यम इंग्रजी आहे आणि सध्या बालवाडी ते चौथीपर्यंत वर्ग भरतात. २०१८ पासून पाचवीचे वर्ग सुरु करण्याचा आमचा मानस आहे. पहिल्या वर्षी शाळेत ५५ विद्यार्थी होते. आता, ९६ विद्यार्थी आहेत. जुलै आणि ऑगस्ट सोडून संपूर्ण वर्ष शाळा भरते. या भागात मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे उन्हाळ्यातही शाळा सुरु असते. शाळेला राज्य सरकारची मान्यता आहे. इंग्रजी, मराठी, गणित, इतिहास आणि परिसर, हे विषय शिकवले जातात. मुलांना जास्त प्रिय असलेले चित्रकला, शिवणकला, मातीकामही शिकवले जाते. "निर्मिती" असे या विषयाला नाव दिलेले आहे.

प्रगती

सध्या शाळेत ५ वर्ग आहेत. एक छोटे मैदानही आहे, ज्याच्या भोवती धावपट्टी तयार केली जात आहे. नेलगुंडा गावात वीज आणि मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळे शाळेची विजेची गरज प्रकल्पातर्फे देण्यात आलेल्या सौरउर्जा उपकरणामार्फत भागवण्यात येते. पाण्यासाठी एक बोअरवेल आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन ४० फुटांच्या विहिरीचे काम चालू आहे.

शाळा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत भरते. मोसमाप्रमाणे शाळेच्या वेळेत बदल केला जातो. प्रत्येक वर्षी दर विद्यार्थ्याला गणवेशाचे ३ संच दिले जातात. रोज विद्यार्थ्यांना नाश्ता आणि दुपारचे जेवण दिले जाते. प्रत्येक वर्गाला आठवड्यातून एकदा ३० मिनिटांचा अॅनिमेशन चित्रपट प्रोजेक्टरवर बघण्याची संधी मिळते. काही महिन्यांपूर्वी, आम्ही संगणक प्रशिक्षणसुद्धा सुरु केले आहे. प्रत्येक शनिवारी, ३-४ विद्यार्थ्यांच्या गटाला साधारण अर्धा तास लॅपटॅाप वापरायची संधी मिळते. MS Word, MS Paint अशी applications विद्यार्थ्यांना शिकवली जातात. सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत हा उपक्रम चालतो.

सुरुवातीला सर्व मुलांना शाळेत पायीच यावे लागे. तेव्हा, प्रकल्पाने सर्व विद्यार्थ्यांना सायकल देण्याचे ठरवले. २० इंचाच्या सायकलसाठी ३०० रुपये एकदाच घेतले जातात. २६ इंचाच्या सायकलसाठी हीच रक्कम ५०० रुपये आहे. ह्यामुळे मुलांमध्ये मालकी आणि जवाबदारीची जाणीव निर्माण होते.

साधना विद्यालया चे विद्यार्थी लोक बिरादरी आश्रम शाळेच्या (हेमलकसा) वर्धापनदिनी आपली कला सादर करतात. हाच प्रयोग नेलगुंडयालाही या मुलांच्या पालकांसाठी केला जातो.

संस्कृती

शाळेची जेव्हा २०१५ ला सुरुवात झाली, तेव्हा मुलं "पुस्तक" किंवा "वाचन" याबद्दल अगदीच अनभिज्ञ होती. आम्ही "नॅशनल जिओग्राफिक"चे काही अंक शाळेत ठेवले. मुलांनी त्यांचे तुकडे तुकडे केले. पण, नंतर त्यांचं लक्ष त्यातल्या चित्रांनी वेधून घेतलं आणि त्यांना पुस्तकं आवडू लागली. जेव्हा मुलांना प्रोजेक्टरवर चित्रपट दाखवले गेले, तेव्हा आम्हांला असाच अनुभव पुन्हा आला. वयाने लहान असलेली मुलं पडद्यावरचे मोठे प्राणी बघून आणि मोठे आवाज ऐकून घाबरली आणि किंचाळू लागली.

शाळेत नियमितपणे पालकांची सभा होते. पहिली सभा हा एक फारच सुखद अनुभव होता, जेव्हा आम्ही पाहिलं कि या दुर्गम भागातले पालकही आपल्या पाल्याच्या प्रगतीबद्दल तेवढेच जागरूक होते, जेवढे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील पालक असतात. ते मुलांना 'लिहिणे' शिकवण्याबद्दल फारच आग्रही होते. मुलांना लवकरात लवकर वही आणि पेन द्यावीत, असं त्यांचं मत होतं. तो खर्च उचलण्यासाठीही ते तयार होते. त्यांना या बाबतीत समजावणं आम्हांला खूपच कठीण गेलं. शेवटी, महत्प्रयासाने त्यांनी २ महिने थांबायची तयारी दाखवली.

आम्ही मुला-मुलींमध्ये "समानता" रुजवण्याचाही प्रयत्न करतो. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून, सर्व विद्यार्थ्यांचा गणवेश टी-शर्ट आणि पँट ठेवण्यात आला आहे. तसेच, सगळेच केसांचा "बॉय-कट" करून येतात.

"स्वयंपाक" हा देखील मुलांसाठी शाळेतील एक नेहमीचा उपक्रम आहे. अर्थात, शिक्षकांच्या देखरेखीखालीच. गुलाबजाम, अंबाडीच्या फुलांपासून बनवलेला जॅम, केक, लाडू, चिक्की, पुलाव, बिर्यानी हे आमच्या "मेन्यू" वरील काही पदार्थ आहेत !!

शाळा आणि गाव यांच्यात एक स्नेहबंध निर्माण करण्यासाठी, विद्यार्थी महिन्यातून एकदा आठवड्याच्या बाजाराची जागा स्वच्छ करतात. प्लास्टिकचा कचरा उचलतात. या उपक्रमासाठी सगळीच मुलं फार उत्साही असतात. मुलं गावकऱ्यांकडे प्लास्टिक कचरा शाळेने ठेवलेल्या कचरापेटीतच टाकण्याचा आग्रह धरतात आणि गावकरीसुद्धा कसलीही का-कू न करता त्यांचं ऐकतात.

शिक्षक

शाळेत प्रकल्पातून केवळ २ शिक्षक येतात. उर्वरित सर्व शिक्षक स्थानिकच आहेत. प्रत्येक शनिवारी, सर्व शिक्षक गेल्या आठवड्यात झालेल्या आणि पुढील आठवड्यात होणाऱ्या कामाबद्दल चर्चा करतात. मान्सूनच्या महिन्यांत जरी शाळा बंद असली तरी सप्टेंबर महिन्यातसुद्धा, जेव्हा शाळा पुन्हा सुरु होते, चांगला पाऊस पडतो. तेव्हा, विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांसाठीदेखील शाळेपर्यंत रोज पोहोचणे फार कठीण असते. कारण, पावसामुळे सगळेच रस्ते आणि नाले भरून वाहत असतात. पण, असली गंभीर परिस्थिती असूनही सर्वच शिक्षक शाळेचा एकही दिवस चुकवत नाहीत.

२०१५ ला, प्रकल्पातून शाळेत येणारे पहिले दोन शिक्षक, साताऱ्याचे संकेत जोशी आणि प्रफुल्ल गुंदेचा होते. ते नुकतेच इंजिनियर झालेले होते. दोघांनीही शाळेत १ वर्ष शिकविले. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा मुलांसाठी नवीन असल्याने, संकेत आणि प्रफुल्लला लोक बिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथे २ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. अजूनही बऱ्याच कार्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षांत शिक्षक म्हणून येथे काम केले आहे. उज्ज्वल भारतीने १ वर्ष काम केले. पुण्याच्या रुबी सप्तर्षी आणि उत्तर प्रदेशच्या असीमाने प्रत्येकी ३ महिने काम केले. डोंबिवलीच्या (मुंबई) वैभवी पोकळेने २ वर्ष काम केले. तिला "अनंत्य झमीर फेलोशिप" मिळाली आहे.

स्थानिक शिक्षकांमध्ये शिल्पा वाचामी आणि मालू मज्जी हे शाळेच्या पहिल्या दिवसापासून शिकवत आहेत. मालू दादा हे अतिशय प्रतिभासंपन्न कलाकार. झाडाच्या खोडात, रस्त्यावरच्या दगडांमध्ये त्यांना वेगवेगळे आकार दिसतात. ते रंगवून, घडवून ते त्याचं एक अतिशय वेगळंच रूप साकार करतात. गोष्ट सांगण्यात तर त्यांचा हातखंडाच.

आम्हांला अजूनही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. प्रतिकूल नैसर्गिक वातावरण, अत्यंत संवेदनशील सामाजिक-राजकीय परिस्थिती, अंधश्रद्धा, रस्ते आणि विजेअभावी मुलांच्या शिकवणीवरही मर्यादा पडतात.

भारत सरकारच्या "Right to Education" अर्थात "शिक्षणाचा हक्क" या उपक्रमासाठी साधना विद्यालयाने एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे, असे आपण अभिमानाने म्हणू शकतो !!

साधना विद्यालयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा