नाते मनुष्य-निसर्गाचे

वन्यप्राण्यांच्या अनाथालयाची ही एक नवलकथा. शिकारीवर जगणारा आदिवासी मिळालेला कुठलाही प्राणी भाजून - शिजवून खात असे. पोट भरण्यासाठी मारलेल्या या प्राण्यांच्या पिल्लांचे हक्काचे घर म्हणजे आमटे यांचे वन्यप्राण्यांचे अनाथालय.

१९७४ साली डॉ. प्रकाश आपल्या सहकाऱ्यांसोबत जंगलात फिरायला जात होते. तेव्हा काही आदिवासी बांधव खाण्यासाठी मारलेले माकड खांद्यावर वाहून गावाकडे चालले होते. त्या मेलेल्या माकडीणीला तिचे जिवंत पिल्लू बिलगून बसलेले होते. त्या आदिवासींना विनंती करून डॉ. प्रकाश यांनी धान्याच्या बदल्यात ते पिल्लू मागून घेतले. अशी या अनाथालयाची सुरुवात एका माकडाच्या पिल्लाने झाली. त्यानंतर लोक बिरादरी प्रकल्पाने अनेक अनाथ प्राण्याच्या पिल्लांना छप्पर दिले आहे - बिबटे, साप, अस्वल, हरणे, मगर, तरस, माकड, घुबड, घारी सारखे विविध पक्षी. स्वतःच्या करमणुकीसाठी नाही तर वन्यजीवांच्या संरक्षणासाठी उभे केलेले हे अनाथालय! त्यातील प्राण्यांवरचे असलेले डॉक्टरांचे प्रेम पाहून आज आदिवासी समाजाला हळूहळू याची जाणीव होते आहे की प्रत्येक वन्यजीव हा आपला शत्रू किंवा आपली शिकार नसते. जीव लावला तर कितीही हिंस्र वाटणारा प्राणी ही माणसावर प्रेम करू लागतो.

अनोख्या प्रेमकथा

आजतागायत हजारांवर प्राण्यांना प्रकल्पाने सांभाळले आहे, शक्य असल्यास सुटका केलेली आहे. काही विस्मृतीत गेले असतीलही; पण अनेक प्राण्यांनी त्यांची मोहोर कायमची इथल्या कार्यकर्त्यांच्या मनावर उमटविली आहे.

राणी - अस्वल
'राणी अस्वल' हा प्रकल्पातला पहिला वन्यजीव आणि म्हणूनच तिला एखाद्या राणी सारखी वागणूक मिळाली. ती कधीच पिंजऱ्यात राहिली नाही तरीही तिने कधीच कुणावर हल्ला केला नाही. दुपारच्या वेळी जेव्हा डॉ. प्रकाश विश्रांती साठी घरी येत असत तेव्हा ही राणी ते वाचत बसलेले असताना त्यांचाच अंगठा चोखत त्यांच्या मांडीवर झोपत असे. रोज संध्याकाळी ती डॉक्टरांबरोबर ३ किलोमीटर दूर असलेल्या नदीवर चालत जात असे. अशी ही राणी, डॉक्टरांनी त्यांचा स्वतःचा २ वर्षाचा मुलगा दिगंत याला जवळ घेतल्यावर देखील नाराजी व्यक्त करत असे.

नेगल - बिबट्या
पहिले २ बिबट्याचे बछडे मांसाच्या कमतरतेमुळे जगू शकले नाहीत आणि पाठोपाठ 'नेगल' ची स्वारी डॉक्टरांकडे आली. या पिल्लाला जगवायचेच असा निर्धार करून डॉक्टरांसह अनेक कार्यकर्ते जवळपासच्या जंगलात -गावात मेलेलं जनावर किंव्हा एखादी मरायला टेकलेली म्हैस मिळते का ते शोधायला बाहेर पडले. अथक शोधकार्यानंतर एक मेलेलं जनावर सापडलं आणि नेगल जगू शकला. आपल्या खेळकर स्वभावाने थोड्याच दिवसात नेगल सगळ्यांचा लाडका झाला. त्यालाही कधी पिंजऱ्यात ठेवण्याची वेळ आली नाही. साप चावल्याचं निमित्त होऊन काही महिन्यातच नेगलचा मृत्यू झाला.

मुन्ना - बिबट्या
'मुन्ना' या बिबट्याचं डॉक्टरांच्या मुलीशी -आरती शी एक अनोखं नातं होतं. छोट्या आरती ची जेव्हा शाळा सुरु झाली तेव्हा मुन्ना सुद्धा तिच्या मागं शाळेत जाऊ लागला आणि शिक्षकांची भंबेरी उडू लागली...शेवटी मुन्नाची शाळा सुटली! प्रकल्पाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. विलास मनोहर म्हणतात की आवाजाला कधीही प्रतिसाद न देणारा असा बिबट्या हा प्राणी - मुन्ना, आरतीला मात्र लगेच प्रतिसाद देत असे.

'सिंदबाद' काळू (कुत्रा) आणि पिल्लू (माकड)
काळू नेहमीच पिल्लूला पाठीवर घेऊन फिरत असे. काळू ‘old man in the sea’ या कथेतील सिंदबादप्रमाणे त्याला घेऊन फिरत असे. त्याने पिल्लूला कधीच एकटे सोडले नाही. ते जंगलातही एकत्र फिरत असत. कुठल्याही झाडावर काहीही खाण्यासारखे दिसले कि पिल्लू टुण्णकन उडी मारून झाडावर चढत असे. तो खाली येईपर्यंत काळू थांबत असे.

एकदा ते रात्री ११ पर्यंत घरी आले नाहीत. तेव्हा डॉ. प्रकाश आमटे आणि श्री. विलास मनोहर (लोक बिरादरी प्रकल्पातील ज्येष्ठ कार्यकर्ते) त्यांना शोधण्यासाठी जंगलात निघाले. त्यांना काळूच्या भुंकण्याचा आवाज आला. तो जणू काही मदतीसाठी हाकच मारत होता. तो एका झाडाखाली सारखा वर बघत उभा होता. पिल्लू त्या झाडावर काही फळे खाण्यासाठी चढला आणि कदाचित अंधार पडल्यावर घाबरला. काळूला त्याच्या प्रिय मित्राला एकटं सोडायचं नव्हतं. म्हणून तो तिथेच उभा राहिला.

चिंटू (कुत्रा)
चिंटू एक रानटी कुत्रा होता. हे सहसा निशाचर असतात. पण मुलं त्याच्याबरोबर दिवसा खेळत असत. त्यामुळे तो रात्री झोपत असे. पिल्लू असताना त्याला रोज दूध दिले जाई. काही कारणाने जर दूध द्यायला उशीर झाला, तर तो त्याची दुधाची रिकामी बाटली तोंडात घेऊन फिरत असे. मोठा झाल्यावर तो जंगलात परत गेला. पण रोज संध्याकाळी साधारण सहा वाजता तो “दूध-रोटी” खाण्यासाठी घरी यायचा. खेळून झाल्यावर रात्री साधारण ९ वाजता तो जंगलात परत जायचा. पाहुणे त्याची ही भेट बघण्यासाठी खास थांबत असत आणि आश्चर्य व्यक्त करत.

सुभाष (बिबट्या) आणि मुंगूस
मुंगूस सुभाषच्या बाजूलाच झोपत असे. सुभाषच्या डोक्यावर, पाठीवर बसून किंवा त्याला चावून तो त्याला सतावित असे. सुभाषला कधी राग आला की तो पुढच्या पायांनी त्याला दाबायचा. मुंगूस ओरडायचा आणि सुभाषने सोडलं की पळून जायचा. काही वेळाने सुभाष उठून त्याच्या जवळ जायचा. त्याने मुंगूसला चाटायला सुरुवात केली की तो सर्व विसरून जात असे आणि सुभाषबरोबर पुन्हा खेळणे सुरु करे.

दुर्दैवाने सुभाष जास्त दिवस जगला नाही. आपल्या प्रिय मित्राला शोधण्यासाठी, मुंगूस बऱ्याच वेळा त्याच्या पिंजऱ्यात येऊन वास घेत असे. एकदा चुकून तो दुसऱ्या बिबट्याच्या पिंजऱ्यात गेला आणि जीव गमावून बसला.

सिंह आणि कुत्रा
५ महिन्यांचा सिंहाचा छावा आणि Great Hound व Doberman कुत्र्यांचे संकरीत पिल्लू फार चांगले दोस्त बनले. डॉ. प्रकाश आमटे या पिल्लामार्फतच छाव्याशी मैत्री करू शकले. छावा पिल्लामागोमाग सगळीकडे फिरत असे. ते बागेत तासनतास खेळत असत. पिल्लाला साखळीने बांधून ठेवले जाई पण छावा मात्र सगळीकडे मुक्तपणे फिरत असे. त्याने कधीही पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्या दोघांची दोस्ती इतकी गहिरी होती की कधी जर छावा दिसला नाही तर डॉ. प्रकाश पिल्लाचे कान खेचत असत आणि तो ओरडल्यावर छावा ताबडतोब हजर होई. पिल्लूदेखील फार चलाख होते. नंतर डॉ. प्रकाशनी त्याच्या कानाला नुसता हात जरी लावला तरी ते ओरडत असे.

सुरुवातीला जेव्हा हेमलकशाला येणारा पक्का रस्ता नव्हता तेव्हा या दुर्गम भागात जणू एक विश्व च सामावलं होतं. कालांतराने जेव्हा रस्ते झाले, दळणवळण वाढले तेव्हा इथली स्थिराचित्तता हळूहळू कमी झाली. आजही या वन्यजीवांच्या अनाथालयात ६० पेक्षा जास्त प्राणी प्रेमाने वाढवले, सांभाळले जात आहेत. फक्त बदललेल्या कायद्यामुळे आज त्यांना बंदिस्त ठेवावे लागत आहे; पण तरीही डॉक्टरांचे त्यांच्यावर व त्या मुक्या प्राण्यांचे डॉक्टरांवर असलेले प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.

भेटा रानमित्रांना