ग्रामविकास योजना

माहिती २०१९

आपल्या प्रकल्पाने मागील ४ वर्षांत १८ गावांमध्ये एकूण २० तलाव खोदले आहेत. बहुतांश तलावात (काही अपवाद वगळता नेलगुंडा, बेजूर व दुडेपल्ली) जून महिन्यापर्यंत मुबलक पाणीसाठा आहे.

बऱ्याच गावांनी तलावाच्या माध्यमातून मासेमारी करून बरेच उत्पन्न मिळविले आहे.
जिंजगाव, कुमरगुडा आणि हलवेर ही गावे मासेमारी उत्पन्नात अग्रणी आहेत. प्रत्येक गावाला मासेमारीतून किमान १ लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.
शेतीसाठी व जनावरांनाही पिण्यासाठी मुबलक पाणी मिळते आहे.

बऱ्याच गावांमध्ये अपुऱ्या पावसामुळे शेतीचे उत्पन्न घटले होते परंतु आपण ज्या ज्या गावात तलाव केले, त्या गावांमध्ये तलावामुळे शेतीला पाणी वापरता आले आणि शेतीचे होणारे नुकसान टळले.

हे सर्व आपण केलेल्या कामाचे फलीत आहे !!


हेमलकसा आणि त्याच्या आसपासची गावे घनदाट जंगले आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जातात. पण येथे काही समस्याही आहेत. पाण्याचे संवर्धन ही एक मोठी समस्या आहे. येथील जमीन पाणी शोषून घेते. तरीदेखील प्रत्येक वर्षी होणाऱ्या मुसळधार पावसानंतरही गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि शेतीसाठी पाणी यांसाठी झगडावे लागते. नदी आणि कालवे यांसारख्या नैसर्गिक स्त्रोतांवरच सर्व गावे अवलंबून असतात. यामुळे पावसाळा संपला की सगळेच (माणसे आणि जनावरे) पाण्यासाठी झगडतात.

श्री. अनिकेत आमटे, लोक बिरादरी प्रकल्पाचे एक संचालक, यांना एक अद्वितीय कल्पना सुचली. त्यांनी गावकऱ्यांना विचारले, "आपण पाण्यासाठी इतर संसाधने, जसे की मोठे तलाव, यांचा विचार करू शकतो का? जर आपण गावाच्या लोकसंख्येनुसार तलाव खोदला, तर प्रत्येकालाच पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेसे पाणी मिळेल. यामुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढण्यासाठीदेखील मदत होईल. प्रत्येकालाच दरवर्षी एकापेक्षा जास्त पिके घेता येतील."

पण त्यांनी काही अटीही घातल्या. त्या खालीप्रमाणे,

१. गावकऱ्यांना तलाव खोदकामाच्या एकूण खर्चापैकी १०% रकमेचे योगदान द्यावे लागेल. यामुळे प्रत्येकातच मालकीची भावना निर्माण होईल आणि प्रत्येकजण तलावाची काळजी घेईल.
२. दारूबंदी
३. तंबाखू, गुटखा, खर्रा बंदी
४. वृक्षतोडबंदी आणि वृक्षारोपण

ग्रामसभेच्या अध्यक्षांना एक सभा घ्यावी लागेल आणि ७०% गावकऱ्यांकडून ह्या अटी पाळण्यासाठी मंजुरी घ्यावी लागेल. हे झाल्यावर तलावाचे खोदकाम सुरु होईल.
तो दिवस होता ६ जानेवारी २०१७, जेव्हा आम्ही "बेजूर" या गावी खोदकाम सुरु केले, जे लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसापासून अल्लापल्लीच्या बाजूला साधारण ३ कि.मी. वर आहे. तलावाचे आकारमान १०० x ५० मीटर आहे आणि तो ३ मीटर खोल आहे. खोदकाम साधारण १५ ते २० दिवसांत पूर्ण झाले. या कामावर साधारण १० लाख रुपये खर्च झाले. याप्रमाणे प्रकल्पाने अनेक गावांत तलाव खोदले आहेत.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या गावांवर क्लिक करा.