लोक बिरादरीचे कार्यकर्ते

या निबिड अरण्यातून वाट काढत अनेक कार्यकर्ते प्रकल्प शोधत हेमलकशात आले आणि इथलेच होऊन राहिले. आज जी उंची प्रकल्पाने गाठली आहे ती या सर्वांशिवाय केवळ अशक्य होती.

डॉ . प्रकाश आमटे

सर्जरीच्या दुसऱ्याच वर्षी कॉलेज कडे पाठ फिरवून एक तरुण या घनदाट अरण्यात शिरला तोच मुळी एक थक्क करणाऱ्या स्वप्नाच्या शोधात...कधीच न परतण्यासाठी! जिथे रोजचं जगणं म्हणजेच एक परीक्षा, तिथे अथक प्रयत्नांनी एक विश्व उभे करणारा हा तरुण म्हणजेच आपले डॉ. प्रकाश आमटे...अजूनही सर्वस्व ओतून काम करत आहेत आणि लोक बिरादरीचा आधारस्तंभ आहेत.

डॉ. मंदाकिनी आमटे

भूलशास्त्राच्या प्राध्यापिका आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या पत्नी यांनीही आपले सर्वस्व या प्रकल्पास वाहिलं आहे. एक समर्थ डॉक्टर असून सुद्धा कुठल्याही कामाची तमा न बाळगता, मग ते एखादं अंग मेहनतीचं काम असो किंवा प्रकल्पाच्या निरीक्षकाची भूमिका असो, त्यांनी नेहमीच सगळ्यात हिरीरीने भाग घेतला. आज त्या लोक बिरादरी प्रकल्पाचा कणा आहेत आणि आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणास्थान आहेत.

श्री. विलास मनोहर

दिमाखदार रेफ्रिजरेशनच्या व्यवसायात व्यस्त असलेल्या, एका अनुरूप जोडीदाराच्या शोधात असताना आणि तिच्या सोबत शहरातल्या एका संपन्न आयुष्याच्या उंबऱ्यावर उभे असताना कसे कोण जाणे हा विलास जंगलाकडे वळला आणि बाबांच्या कर्तृत्वाने भारावून जाऊन, हसतमुखाने इथल्या जगण्यात सामावून गेला. बाबांच्या मुलीशी विवाह झाल्यानंतर आजतागायत श्री विलास प्रकल्पाचा एक भाग बनून राहिले आहेत. आज प्रकल्पाच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्री विलास यांनी त्यांच्या आजवरच्या इथल्या अनुभवावरून अनेक सुंदर पुस्तके लिहिली आहेत.

सौ. रेणुका आमटे-मनोहर

बाबा आणि ताईंची ही मुलगी म्हणजे कष्टाळूपणाचे मूर्तिमंत उदाहरण. प्रकल्पातल्या निवासी शाळेतल्या मुलांवर खूप प्रेम, आणि त्या बरोबरीने संस्कार करणाऱ्या सौ. रेणुका सतत कार्यमग्न असतात. शाळेत दाखल होणाऱ्या प्रत्येक लहान मुलाला, ज्यांनी कधीच शौचालय पहिलं देखील नसतं, त्यांना आई च्या सोशिकतेने त्या स्वच्छतेच्या सवयी लावतात.

श्री. गोपाळ फडणीस

बल्लारपुरात एका नावाजलेल्या कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्रोफेसर फडणीसांनी बाबांच्या विचारांनी भारावून जाऊन एक जिद्दी आणि साहसी निर्णय घेतला, लोक बिरादरी प्रकल्पासाठी स्वेच्छेने काम करण्याचा. ते जेव्हा स्वतः पहिल्यांदा प्रकल्पात आले तेच मुळी ६५ किमी चा रस्ता पायी तुडवत, कारण पावसामुळे तिथे येणारे सर्वच रस्ते वाहनांसाठी पूर्ण बंद झाले होते. इथे पोहोचले आणि सेरेब्रल मलेरिया च्या विषाणूंच्या प्राणघातक हल्ल्याने ते पंधरा दिवस अंथरूणास खिळून होते पण तरीही न डगमगता स्वकष्टाने त्यांनी या भागातील सर्वात पहिली शाळा सुरु केली.

श्री. जगन्नाथ मचकले

एक कॉलेज युवक सोमनाथ च्या प्रकल्पाला सहज भेट देतो काय आणि बाबांच्या सान्निध्याने सर्वार्थाने आपले आयुष्य या कार्यास देऊन टाकतो काय …सर्वच अजब. अशा या श्री.जगन्नाथ यांनी समर्थपणे नागेपल्ली हा लोक बिरादरी चा प्रकल्प कित्येक वर्षे एकहाती सांभाळला आहे. हेमलकसाहून ६५ किमी अंतरावर असणाऱ्या नागेपल्लीतून श्री. जगन यांनी असंख्यवेळा सायकलवरून ताई-बाबांचे निरोप, आनंदवनातून येणारी शिदोरी हेमलकसास पोहोचवली आहे.

श्री. मनोहर आणि सौ. संध्या येम्पलवार

लोक बिरादरी प्रकल्पाच्या जमा खर्चाची सर्व जबाबदारी श्री. मनोहर पाहतात आणि सौ. संध्या हॉस्पिटलमधे गेले ३५ वर्षांपासून अनेक आदिवासींच्या बाळंतपणात हातभार लावत आहेत.

श्री. बबन पांचाळ

श्री. बबन पांचाळ अतिशय शिस्तबद्धपणे व व्यवस्थितरीत्या गेले ३० वर्षांपासून दवाखान्यात विविध प्रकारच्या जवाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडत आहेत.

श्री. गोविंद पांचाळ

श्री. गोविंद शाळेचे काम पाहत होते. ते अनेक वर्षे प्राथमिक इयत्तांचे मुख्याध्यापक होते.

डॉ. दिगंत आमटे

डॉ. दिगंत आमटे हे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी यांचे थोरले चिरंजीव. लोक बिरादारीच्याच शाळेत शिक्षण घेऊन पुढे MBBS डॉक्टर झाले. आपल्या आई वडिलांसारखेच इथल्या आदिवासींच्या सेवेसाठी आपले आयुष्य सार्थकी लावायचे हे डॉ. दिगंत यांनी ठरवले. लोक बिरादरीचा दवाखान्याचे नेतृत्व सध्या ते करीत आहेत.

डॉ. अनघा आमटे

डॉ. अनघा आमटे या डॉ. दिगंत यांच्या पत्नी. गोव्याचे माहेर असलेल्या डॉ. अनघा सध्या लोक बिरादरीच्या दवाखान्याचे सगळे काम डॉ. दिगंतच्या खांद्याला-खांदा लावून पुढे नेत आहेत. स्त्रीरोगतज्ञ डॉ. अनघा आल्यापासून लोक बिरादरीच्या दवाखान्यात सिझेरीयन ऑपेरेशंस सुधा होऊ लागली आहेत. लोक बिरादरीचा नवीन दवाखाना उभारण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

श्री. अनिकेत आमटे

श्री. अनिकेत आमटे हे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी यांचे धाकटे चिरंजीव. पुण्याहून अभियांत्रिकी पदविका घेऊन पुन्हा हेमलकसाची वाट धरलेला हा कुशल कार्यकर्ता सध्या लोक बिरादरीच्या प्रशासकाची भूमिका यशस्वीरीत्या पार पाडत आहे. लोक बिरादरीची शाळा, बांबू हस्तकला केंद्र, दुग्ध केंद्र, आणि लोक बिरादरीचे सगळे व्यवस्थापन ते पाहतात.

सौ. समिक्षा गोडसे-आमटे

सौ. समीक्षा गोडसे-आमटे या अनिकेत आमटे यांच्या पत्नी. लोक बिरादरीच्या शाळेची जवाबदारी त्या यशस्वीरीत्या पार पडत आहेत. अर्थशास्त्रामध्ये MA झालेल्या समिक्षा यांनी लोक बिरादरीच्या शाळेत नव-नवीन उपक्रम वेळो-वेळी आणले आहेत. बहुभाषिक शिक्षणाचे यशस्वी प्रयोग त्यांनी लोक बिरादरीच्या शाळेत राबवले आहेत.

श्री. केतन फडणीस

नव्या पिढीचे कार्यकर्ते श्री. केतन फडणीस (श्री. गोपाळ फडणीस यांचे चिरंजीव), श्री. मनोहर यांच्या बरोबर लोक बिरादरीच्या ऑफिसमध्ये जमा खर्चाची आणि देणगीची कामे पाहतात.

श्री. सचिन मुक्कावार

नव्या पिढीचे कार्यकर्ते श्री. सचिन मुक्कावार २००५ पासून प्रकल्पात येणाऱ्या पाहुण्यांची सोय आणि त्या संदर्भातले सर्व व्यवस्थापन पाहतात.

श्री. जगदीश बुरडकर

दवाखान्यातील जुने कार्यकर्ते श्री. जगन्नाथ बुरडकर यांचा सुपुत्र विशेष प्रशिक्षण घेऊन डोळ्याचे रोग तपासण्याचे महत्वाचे काम करत आहे.

श्री. गणेश हिवरकर

शेगाव इथून आलेला तरूण कार्यकर्ता विशेष प्रशिक्षण घेऊन आदिवासींना चष्मा बनवून देण्याचे कार्य करत आहे.

श्री. मिथिल कुलकर्णी

२०१० पासून श्री. मिथिल हे शाळेच्या संगणक केंद्राचे काम पाहत आहेत आणि अत्यंत प्रेमाने शाळेच्या मुलांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देत आहेत.

श्री. प्रफुल्ल पवार

प्रकल्पाची संपूर्ण माहिती आलेल्या पाहुण्यांना देणे, प्रकल्पाचे बांबू हस्तकला आणि पुस्तक विक्री केंद्र या सगळ्याची जवाबदारी श्री. प्रफुल्ल अगदी सहजतेने पार पडतात.

स्थानिक कार्यकर्ते

बाहेरून आलेल्या या कार्यकर्त्यां सोबत अरविंद मडावी, शारदा ओक्सा सारखे येथील अनेक आदिवासी तरूण-तरूणी दवाखान्यात हातभार लावत आहेत.