कोयनगुडा - आदर्श गाव

कोयनगुडा गाव लोक बिरादरी प्रकल्पाला लागूनच आहे. गावांत “वतनकार” समाजाचे लोक राहतात. ते ओतीव कामातील उत्तम कारागीर आहेत आणि दैनंदिन वापरासाठी लागणारी विविध साधने, धान्य-भाजीपाला यांची साठवण करण्यासाठी भांडी, शोभेच्या वस्तू इ. बनवितात. "महुआ"च्या फुलांपासून बनविलेल्या दारूचे व्यसन ही येथील एक मोठी समस्या आहे. व्यसनाधीनता येथे १००% आहे, म्हणजेच पुरुष आणि स्त्रिया, दोघेही या समस्येने ग्रस्त आहेत.

यामुळेच जेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी एक तलाव खोदून देण्याची विनंती केली, लोक बिरादरी प्रकल्पाने ठरविले की गावात तलाव तर खोदायचाच, पण संपूर्ण गाव "आदर्श गाव" म्हणून विकसित करायचे. ग्रामसभेने नियमितपणे दारू पिणाऱ्या गावकऱ्यांवर दंड आकारण्याचे ठरविले.

तलावाचे खोदकाम सुरु करण्यापूर्वी ग्रामभेबरोबर एक करार करण्यात आला. त्यात खालील कलमे होती.

१. दारूबंदी
२. तंबाखू, गुटखा, खर्रा बंदी
३. वृक्षतोडबंदी
४. शिक्षणाचा हक्क
५. शिकारबंदी आणि वन्य प्राण्यांचे संगोपन
६. तंटामुक्त गाव

करार झाल्यावर काम मार्च २०१७ला सुरु झाले. अंदाजपत्रक साधारण ९ लाख रुपयांचे होते. १ लाख रुपये गावातून गोळा करण्यात आले. यामुळे, गावकऱ्यांत एक मालकीची भावना निर्माण झाली. काम पूर्ण होण्यास साधारण १ महिना लागला.

तलावाचे आकारमान १०० x ५० मीटर आहे आणि तो ३ मीटर खोल आहे. मुसळधार पावसामुळे तलाव भरल्यास अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी "Waste Wear" नावाची यंत्रणादेखील कार्यान्वित करण्यात आली आहे.

एक उघडी विहिर बांधण्यात आली आहे, जिचा व्यास १६ फूट आहे आणि जी ४० फूट खोल आहे. पाण्याची एक टाकीदेखील बांधण्यात आली आहे, जिची उंची २५ फूट आहे आणि साठवण क्षमता ५० हजार लिटरची आहे. ५ हॉर्स पॉवरचा (HP) एक सौरउर्जेवर चालणारा पंप विहिरीतील पाणी खेचून टाकीत भरतो.

कोयनगुडा गावात साधारण ७० घरे आहेत. प्रत्येक घरात पाण्याचा नळ देण्यात आला आहे.

पाण्याच्या टाकीवर ७.५ लाख रुपये खर्च झाले. विहिरीवर ९ लाख रुपये खर्च झाले. एवढीच रक्कम पाईपलाईनवरदेखील खर्च झाली.

कोयनगुडा गावाला आदर्श गाव बनविण्यातील पुढची पायरी म्हणजे शौचालय बांधणे. एक शौचालय नमुना म्हणून बांधण्यात येत आहे. जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर प्रत्येक घरात एक शौचालय बांधण्यात येईल.

ग्रामविकास योजनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

आधी
नंतर